अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | अकोल्यातील पळसो बढे गावात झोपेत असताना सर्पदंश झाल्याने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रूपाली गोवर्धन खांडेकर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. विषारी मन्यार जातीच्या सापाने दंश केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रूपाली खांडेकर घरातील खोलीत झोपलेली असताना अचानक हाताच्या बोटाला तीव्र वेदना जाणवली. झोपेतून जागी होताच तिला बाजूला विषारी साप दिसला. तिने तत्काळ आरडाओरड केली आणि घरातील सदस्य धावत आले. घबरलेले कुटुंबीय तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.
मात्र, सर्पदंश अत्यंत विषारी असल्याने उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच ढासळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी मन्यार जातीच्या सापाचा दंश असल्याचे स्पष्ट केले. तिच्या मृत्यूने संपूर्ण पळसो बढे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावात शोककळा पसरली आहे.
रूपाली ही सुसंस्कृत, शांत स्वभावाची आणि कुटुंबवत्सल होती. तिच्या अचानक निधनामुळे गावातील युवक-युवतींमध्येही खिन्नता आहे.

दरम्यान, सर्पदंशाच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वाढ होत असल्याने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्री झोपताना गादीभोवती जाळी लावणे, पायाजवळ दिवा ठेवणे, आणि घरात स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.