अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात जमिनीखाली पुरून त्यावर टाईल्स लावणाऱ्या आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पेल्हार पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या दोघांनी मिळून विजय चौहान (वय 34) यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील ओम साई वेल्फेअर सोसायटीत घडली असून, मृतदेह तब्बल 15 दिवस घरात लपवून ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौहान यांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्या भावांनी चौकशी केली. सुरुवातीला पत्नी चमन देवीने “ते बाहेर गेले आहेत” असे सांगितले. मात्र, वारंवार संपर्क न झाल्याने आणि घरातून दुर्गंध येऊ लागल्याने अखेर नातेवाइकांनी दरवाजा तोडून घराची तपासणी केली. जमिनीखाली खोदल्यावर मृतदेह आढळून आला.
चमन देवी आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा यांनी मिळून विजय यांची हत्या केली आणि मृतदेह घरातच जमिनीत पुरला. मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी त्या भागावर नव्या टाईल्स लावल्या होत्या. इतकंच नव्हे तर चमन देवीने विजयच्या मेहुण्याच्या हातूनच टाईल्स लावून घेतल्याचा धक्कादायक तपशील पुढे आला आहे. हत्या केल्यानंतर दोघेही फरार झाले होते.
पेल्हार गुन्हे शाखेच्या टीमने विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. अखेर पुण्याच्या हडपसर भागात म्हाडा कॉलनीजवळ आरोपी मिळाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पेल्हार पोलिस ठाण्यात आणण्यात येणार आहे. चमन देवीसोबत तिचे लहान बाळही असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संपूर्ण घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. प्रेमसंबंधातून पतीची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज तपासात व्यक्त करण्यात आला आहे. तपास अधिक गतीने सुरू असून, आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.