अकोला न्यूज नेटवर्क
पुणे | राज्यातील अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 आणि 23 जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याची अंतिम संधी दिली आहे. दुसऱ्या फेरीअखेर राज्यभरात एकूण 14 लाख 20 हजार 764 जागा अद्याप रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा राज्यातील 9,511 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या एकूण 21 लाख 41 हजार 430 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 17.66 लाख जागा सामान्य कॅप प्रक्रियेतून आणि 3.75 लाख जागा विविध कोट्यांद्वारे भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत 14 लाख 19 हजार 861 विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून, त्यापैकी केवळ 7 लाख 20 हजार 666 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
दुसऱ्या फेरीत 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यापैकी केवळ 2 लाख 15 हजार 157 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. यामध्ये 1.74 लाख विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, तर 40 हजार 849 विद्यार्थ्यांनी कोट्यांद्वारे प्रवेश घेतला.
विभागनिहाय आकडेवारीनुसार दुसऱ्या फेरीत मुंबईत सर्वाधिक 55,965 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पुण्यात 36,421, नाशिक 22,126, नागपूर 21,518, अमरावती 20,117, छत्रपती संभाजीनगर 27,957, कोल्हापूर 17,317 आणि लातूरमध्ये 13,738 प्रवेश झाले.
आता तिसऱ्या फेरीतील पसंतीक्रम भरल्यानंतर 26 जुलै रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 26 ते 28 जुलै या कालावधीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया होईल. यानंतर 30 जुलै रोजी चौथ्या फेरीसाठी उर्वरित रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेत अद्याप मोठा संख्येने विद्यार्थी सहभागी न झाल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये जागा भरल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि पुढील फेर्यांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध राहतील, असा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.