WhatsApp

पतीच्या वाढदिवशी मृत्यूला कवटाळलं; बाईकसाठी छळ

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात आणखी एका विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ‘वैष्णवी हगवणे’ आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी जागवणाऱ्या या घटनेत किरण धामोदर (वय ३०) या महिलेने आपल्या पतीच्या वाढदिवशीच गळफास घेऊन जीवन संपवले.



ही हृदयद्रावक घटना मोशीतील बोर्हाडेवस्ती येथे १७ जुलै रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्या किरण यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील जवळखेड बु. आहे. त्यांच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पती आशिष धामोदर (वय ३२), सासू सुनंदा धामोदर (५०) आणि सासरे दीपक धामोदर (६०) यांच्यावर हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला पोलिसांनी अटक केली असून इतर दोघांचा तपास सुरू आहे.

पोलिस तपासात उघड झाले की, किरणच्या पती आणि सासरच्या मंडळींनी वेळोवेळी पाच लाख रुपयांची मागणी केली होती, जी तिच्या वडिलांनी त्यांच्या क्षमतेनुसार दिली. मात्र यानंतरही समाधान न मानता आरोपींनी आणखी एका मोटारसायकलसह अधिक पैशांची मागणी सुरू ठेवली.

पैशाच्या मागणीतून किरणवर मानसिक आणि शारीरिक छळ वाढत गेला. तिच्यावर नियमित शिवीगाळ, मारहाण, आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. अखेर या त्रासाला कंटाळून तिने १७ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

विशेष बाब म्हणजे किरणच्या पतीचा त्या दिवशी वाढदिवस होता. तिने त्याच्यासाठी केक आणला होता. पतीचे मित्रही उपस्थित होते. मात्र, केक कापल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तणावात असलेली किरण थेट आपल्या खोलीत गेली. काही वेळातच तिने गळफास घेतल्याचे समजताच पतीने आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलावले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

किरणच्या मृत्यूने सासरी काही तासांपूर्वीचे आनंदाचे वातावरण अचानक दुःखात बुडाले. एका विवाहितेचा पतीच्या वाढदिवसाला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागणाऱ्या या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रमाणेच या घटनेनेही महिलांवरील छळाचा भयावह चेहरा पुन्हा समोर आणला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!