अकोला न्यूज नेटवर्क
ओडिशा |वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असलेल्या १८ वर्षांच्या तरुणीवर निर्जनस्थळी नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ओडिशामधील जगतसिंगपूर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघाली होती. मैत्रिणीच्या घरी पोहोचण्याआधीच काही नराधमांनी तिला अडवून निर्जन स्थळी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. यावेळी तिला मारहाणही करण्यात आली. अत्याचारानंतर आरोपी तिला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले.
गंभीर अवस्थेत असतानाही पीडित तरुणी घरी पोहोचली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असून तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक भवानी शंकर यांनी सांगितले की, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींना पकडण्यासाठी तीन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. या घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.