WhatsApp

आश्रमशाळेतील भयावह घटना: शाळकरी मित्रांनीच केला विद्यार्थ्याचा खून?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
भोकरदन (जालना) | जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेतील वसतिगृहात आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून पोलिसांनी याच वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.



जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली. मृत मुलाच्या गळ्यावर दोरीने गळा घोटल्याचे स्पष्ट खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा खून असल्याचा संशय घेत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान त्याच वसतिगृहात राहणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे समोर आले.

हे तिघेही विद्यार्थी भोकरदन येथील वसतिगृहात राहत होते. आरोपींपैकी एक मृत मुलासोबतच एका खोलीत राहत होता, तर दुसरा दोन खोल्यांच्या अंतरावर होता. प्राथमिक तपासात मुलांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातूनच ही हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री सुमारे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, शालेय वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!