अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेचा दुसरा वर्ष सुरू झाला असला तरी या वर्षातील पहिला हप्ता अद्याप पात्र लाभार्थिनींच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे राज्यभरातील सुमारे दोन कोटी ४७ लाख महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरु करण्यात आली होती. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थिनींना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. गेल्या वर्षभरात एकूण १२ हप्त्यांचे अनुदान देण्यात आले. मात्र, या वर्षीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण अद्याप झालेले नाही.
योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ कधी मिळणार, याबाबत अनेक बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पहिला हप्ता या महिनाअखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत लाभार्थिनींच्या खात्यात जमा करण्यात येईल. वितरण यंत्रणेच्या नियोजनात थोडा वेळ लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या योजनेत पात्रता निकषांचा फेरआढावा घेण्यात आला असून, त्यात न बसणाऱ्या सुमारे दहा लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थिनींची संख्या पूर्वीच्या २ कोटी ३४ लाखांवरून आता २ कोटी ४७ लाखांवर स्थिरावली आहे. अपात्र लाभार्थिनींची छाननी करून गरजू व निकषात बसणाऱ्या महिलांची अंतिम यादी महिला व बालविकास विभाग तयार करत आहे.
महिन्याला मिळणारा हा आर्थिक लाभ अनेक महिलांसाठी आधारस्तंभ ठरत असल्याने लाभाच्या विलंबामुळे काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने ठरलेल्या वेळेत लाभ देण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.