अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | नवविवाहित असतानाच पतीकडून १२ कोटी रुपयांची पोटगी, BMW कार आणि मुंबईतील फ्लॅटची मागणी करणार्या महिलेच्या प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ उडवली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी महिलेनं केलेल्या मागण्या ऐकून सरन्यायाधीश गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि उच्चशिक्षित महिलेला “पतीच्या पैशांवर अवलंबून न राहता स्वतः कमवा” असा स्पष्ट सल्ला दिला.
या प्रकरणात महिलेने न्यायालयात नमूद केलं की, पती खूप श्रीमंत आहे. त्याला वर्षाकाठी २.५ कोटींचे वेतन आणि एक कोटी रुपयांचा बोनस मिळतो. त्यामुळे तिची पोटगीसाठी केलेली मागणी योग्य असल्याचा तिचा दावा होता. परंतु न्यायालयाने विचारले की, लग्नाला अवघे १८ महिने झाले असूनही BMW आणि कोटींच्या पोटगीची मागणी करणं कितपत योग्य आहे?
महिलेने दावा केला की, पतीने तिला स्किझोफ्रेनिया असल्याचा आरोप करत विवाह रद्द करण्याची मागणी केली आहे. या आरोपावर उत्तर देताना तिने न्यायालयातच प्रश्न केला, “मी स्किझोफ्रेनियाग्रस्त दिसते का?”
महिला एमबीए शिक्षण घेतलेली असून आयटी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. न्यायालयानं याचा उल्लेख करत सांगितलं की, ती सक्षम असून तिला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. “तुम्ही शिक्षित आहात, मग पतीकडून भीक मागताय का?”, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.
पतीच्या बाजूने उपस्थित वरिष्ठ विधिज्ञ माधवी दिवाण यांनी युक्तिवाद करत सांगितले की, महिलेची स्वतःची मालमत्ता असून ती भाड्याने दिली आहे. याशिवाय ती काम करू शकते, त्यामुळे अतिरिक्त पोटगी मागणं न्याय्य नाही. तसेच महिला पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही, हेही न्यायालयानं स्पष्ट केलं.
सुनावणीअखेर न्यायालयानं महिलेला दोन पर्याय दिले – मुंबईतील फ्लॅट स्वीकारावा किंवा ४ कोटी रुपये घेऊन पुणे, हैदराबाद, बंगळुरू यासारख्या आयटी हबमध्ये नोकरी करावी. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.