अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर | बहिणींच्या रक्षणाची हमी देणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच बहिणी सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका दिवशी दोन महिलांवर झालेल्या अत्याचार व छेडछाडीच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एकीकडे मावस भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले, तर दुसरीकडे नागपूरच्या गर्दीच्या इतवारी भागात भरदिवसा एका तरुणीची छेडछाड झाली.
पहिली घटना एमआयडीसी परिसरात घडली. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून नागपूरमध्ये मजुरीसाठी आलेल्या कुटुंबात मावस भावाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अतुल उर्फ दिनेश यादव असे आरोपीचे नाव असून तो पीडितेच्या घरीच वास्तव्यास होता. पीडितेचे पालक बाहेर असताना, घरात एकटी असलेल्या मुलीवर अतुलने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला धमकी दिली व तिच्या धाकट्या बहिणीलाही त्रास दिला. मात्र मुलीने हिंमत दाखवून कुटुंबीयांना सांगितले. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना इतवारी परिसरातील आहे. रविवारी दुपारी १२:३० वाजता किराणा दुकानातून खरेदी करून परतत असलेल्या २४ वर्षीय तरुणीला ३०-३५ वयोगटातील एक अनोळखी तरुण सतत पाठलाग करत होता. यावेळी त्याने तिच्यावर आक्षेपार्ह कृत्य करत जवळ येण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या मैत्रिणीने हस्तक्षेप केला असता आरोपी पळून गेला. त्यानंतर पीडितेने तहसील पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या दोन घटना म्हणजे शहरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर स्थिती असल्याचे सूचित करतात. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच महिला असुरक्षित असल्याने पोलिस प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.