अकोला न्यूज नेटवर्क
बुलढाणा : भाजप आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय व चालक पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले असून त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी थेट तिघांवर खुनाचा संशय व्यक्त करत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांचा समावेश असून, त्याच्यासोबत गजानन सरोदे आणि परीक्षित ठाकरे ही दोन नावेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. इतकंच नव्हे तर या संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांचीही नावे त्यांनी दिली आहेत.
३ मे रोजी पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यानंतर पोलीसांनी नातेवाईकांच्या परवानगीशिवाय शवविच्छेदन करून हा प्रकार आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांच्या पत्नीने सुरुवातीपासूनच हा घातपात असल्याचे म्हटले आणि सीआयडी चौकशीची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर त्यांनी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन नावे सादर केली. संशयितांची नावे पुढीलप्रमाणे :
- निलेश शर्मा – आमदार संजय कुटे यांचे पीए
- गजानन सरोदे – आमदार कुटे यांचे नातेवाईक
- परीक्षित ठाकरे – कंत्राटदार
याशिवाय, या तिघांना मदत केल्याचा आरोप खालील तीन पोलिसांवर केला आहे :
- श्रीकांत निचळ – पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद
- अमोल पंडित – पोलीस उपनिरीक्षक
- सचिन राजपूत – गोपनीय विभाग कर्मचारी
या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप स्पष्ट भूमिकाही जाहीर झालेली नाही. दरम्यान, सीआयडी चौकशीची मागणी अद्याप मान्य झालेली नसून, तीन महिने उलटून गेले तरी मृत्यूच्या कारणांबाबत कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. त्यामुळे आता या तक्रारींवर पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.