अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) ३ ते ४ टक्क्यांची वाढ जाहीर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होण्याची शक्यता असून, त्याचे थकबाकीसह पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे.
दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकावर आधारित DA वाढवण्याची केंद्र सरकारची पद्धत आहे. जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यांत महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. जानेवारीतील वाढीची घोषणा फेब्रुवारी–मार्चमध्ये होते, तर जुलैच्या DA ची घोषणा सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये होते. यंदाही तसाच पायंडा पडणार असून, जून अखेरीस ‘कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स’ (CPI-IW) स्थिर राहिल्यास DA मध्ये ३% ते ४% इतकी वाढ निश्चित मानली जात आहे.
सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी ५५% DA घेत आहेत. नव्या वाढीमुळे तो ५८% किंवा ५९% वर जाऊ शकतो. म्हणजेच, १८,००० रुपयांचा मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याच्या DA मध्ये सुमारे ५४० रुपयांची वाढ होईल. यामुळे त्यांचा एकूण DA १०,४४० रुपयांवर पोहोचू शकतो. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, आठव्या वेतन आयोगाची तयारी केंद्र सरकारकडून सुरू असून, त्याआधी DA वाढीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. DA वाढीची अंतिम घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर जुलै २०२५ पासून लागू होणाऱ्या DA चा फरक थकबाकीसह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
महागाई दर सातत्याने वाढत असल्याने DA वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक झाली आहे. सरकारने यापूर्वीही वेळेवर DA वाढ करून आर्थिक दिलासा दिला आहे. यावेळीही हीच परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.