अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने केली आहे. या निधीला आता परदेशातूनही आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी फॉरेन काँन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (एफसीआरए) मान्यता मिळाली आहे. यामुळे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर फंडातून थेट आर्थिक मदत मिळणार आहे. यासोबतच, क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून गरीब रुग्णांना उपचारांसाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी जाहीर केले.
रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रथमच क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय कराराद्वारे रुग्णांना मदत केली जाणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती आणि रुग्णालये यांचे सहकार्य असेल. या योजनेत रुग्णांचेही काही प्रमाणात योगदान अपेक्षित आहे. यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येत असून, पुढील तीन महिन्यांत ते कार्यान्वित होईल. ज्या रुग्णांच्या उपचारांचा खर्च कोट्यवधींमध्ये आहे, अशा वेळी इतर योजनांचा लाभ घेऊनही निधी अपुरा पडतो. अशा परिस्थितीत क्राऊड फंडिंग महत्त्वाची ठरणार आहे. यात मुख्यमंत्री निधी, कॉर्पोरेट कंपन्या, एनजीओ आणि रुग्णालये मिळून रुग्णांना आधार देणार आहेत.
नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३० जून २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत १४ हजार ६५१ रुग्णांना १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान २ लाख ३२ हजार २६५ रुग्णांना १६५ कोटी ४ लाख २४ हजार ८५७ रुपयांची आर्थिक मदत मिळाली. ही योजना आता परदेशी निधीच्या समावेशामुळे अधिक बळकट होणार आहे. पुढील तीन महिन्यांत क्राऊड फंडिंग सुरू होईल, ज्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळेल.