अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : कल्याण शहरात एका मराठी तरुणीला क्लिनिकमध्ये ड्युटीवर असताना परप्रांतीयाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नांदिवली परिसरातील श्री बालचिकित्सा क्लिनिकमध्ये ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. गोकुळ झा असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णाच्या नावे क्लिनिकमध्ये आलेल्या गोकुळ झा या तरुणाने रिसेप्शनिस्ट तरुणीला डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्यास अडवल्याने चिडून तिला शिवीगाळ केली व नंतर बेदम मारहाण केली. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, “साडेसहाच्या सुमारास मी त्याला थांबवले असता त्याने माझ्या केसांना धरून खेचले. मला लाथाबुक्क्यांनी मारले. त्याचा राग अनावर होता. मी त्याच्याशी अकारण वाद घातला नव्हता. मी केवळ डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याला थांबवले होते.”
या घटनेचा थरकापजनक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, त्यात आरोपी गोकुळ झा हा तरुणीवर थेट हात उगारत आहे. तिचे केस ओढणे, तिला फरफटत खेचणे आणि जोरदार मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेण्याचे आश्वासन दिले असून, ठाकरे गटाचे आमदार दिपेश म्हात्रे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “अशा घटना वारंवार घडत असून अशांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. महिला सुरक्षितता ही प्राथमिकता असली पाहिजे.”
दरम्यान, मानपाडा पोलीस आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत. आरोपी गोकुळ झा सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. प्रशासनाकडून पीडित तरुणीला योग्य संरक्षण आणि न्याय मिळावा, अशी मागणीही जोर धरत आहे.