WhatsApp

होमगार्ड महिलेवर दोन एसीपींचा अत्याचार? करुणा मुंडेंचा आरोप अन् सरकारला थेट इशारा!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
ठाणे |ठाणे जिल्ह्यातील एका महिला होमगार्डने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करताच राज्यातील पोलीस दल आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. करुणा मुंडे यांच्या उपस्थितीत पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली असून संबंधित एसीपींवर कठोर कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.



पीडित महिलेच्या आरोपानुसार, ठाण्यातील एका एसीपीने तिची ओळख करून घेतल्यानंतर सातत्याने मेसेज पाठवत संपर्क वाढवला. एका प्रसंगी पत्नीच्या सांगण्यावरून चहा प्यायला बोलावल्याचे सांगून त्याने तिला घरी बोलावले. घरी गेल्यानंतर पाण्यात गुंगीचे औषध देऊन त्या एसीपीने आणि दुसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे.

पुढे ती कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिथे तिची तक्रार नोंदवली गेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तिने मदतीसाठी धाव घेतली, पण कोणाच्याही कडून प्रतिसाद मिळाला नाही. उलट तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इतकंच नव्हे तर तिच्या अल्पवयीन मुलींनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

या साऱ्या प्रकरणावर करुणा मुंडे यांनी कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. “जर पोलीस दलातील महिलेलाच संरक्षण मिळत नसेल तर सामान्य महिलांचं काय? गृहमंत्र्यांनी यावर त्वरित कारवाई करावी. आठ दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर पीडिता आत्महत्येचा निर्णय घेईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

प्रकरणातील आरोपी एसीपींविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर आणि महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पीडितेने सादर केलेल्या पुराव्यांसह आरोपींचे फोटोही माध्यमांसमोर सादर केले आहेत.

या घटनेनंतर महिला सुरक्षा, पोलीस यंत्रणेतील नैतिक अधःपतन, आणि पीडित महिलांना न्याय मिळवताना येणाऱ्या अडथळ्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. महिला अत्याचाराचे हे गंभीर प्रकरण आता केवळ पोलीस दलापुरते मर्यादित राहिले नसून राज्यातील राजकीय आणि सामाजिक पातळीवरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!