अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत ऑनलाइन रम्मी खेळल्याच्या कथित व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी थेट दिल्लीत पोहोचली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेऊन कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी केली आहे.
या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील, अरविंद सावंत, कल्याण काळे, प्रतिभा धानोरकर, शामकुमार बर्वे, विशाल पाटील यांचा समावेश होता. सुळे यांनी सांगितले की, कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांविरोधी विधानं करतात. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात रम्मी खेळणे ही अत्यंत निंदनीय गोष्ट असून अशा व्यक्तीला कृषीखात्याची जबाबदारी देणे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला चपराक आहे.
सुळे म्हणाल्या, “कोकाटे यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील विधानं केली आहेत. कर्जमाफीसंबंधीची वक्तव्यं, अरेरावीची भाषा, वादग्रस्त वागणूक ही महाराष्ट्राच्या परंपरेला लागलेली काळिमा आहे. अशा व्यक्तीच्या हातात कृषी खातं राहिल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे शक्य नाही.”
या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे विनंती केली की, कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांच्या जागी शेतकऱ्यांच्या समस्यांची खरी जाण असलेला संवेदनशील मंत्री नेमावा. यावर अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.