अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत “फोनवर पॉप-अप गेम आला होता, तो स्किप करत होतो” असं म्हटलं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर करून कोकाटेंच्या दाव्याला थेट आव्हान दिलं आहे.
रोहित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर कोकाटे रमी खेळत असल्याचे दोन वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले. यासोबतच त्यांनी उपस्थित केलेला सवाल चर्चेचा विषय ठरला – “कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी तब्बल ४२ सेकंद लागतात?” हे विचारून कोकाटेंच्या स्पष्टीकरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
या संपूर्ण प्रकाराबाबत कोकाटे म्हणाले, “मी रमी खेळत नव्हतो, गेमचा पॉप-अप आला होता. फोन नवीन असल्यामुळे लगेच स्किप करता आलं नाही.” ते पुढे म्हणाले की, “जर या प्रकरणाची चौकशी झाली आणि मी दोषी आढळलो तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मी राजीनामा देईन.”
मात्र, रोहित पवारांनी कोकाटेंचं हे स्पष्टीकरण धुडकावलं आहे. ते म्हणाले, “सभागृहात आदिवासी समाजाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाही मंत्री मोबाइलमध्ये रमले होते. हे वर्तन अत्यंत निषेधार्ह असून विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी करणारे आहे.”
“गिरे तो भी टांग उपर” अशी टीका करत पवारांनी कोकाटेंवर हल्लाबोल केला. “राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपकार करणार असे वाटले होते, पण त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा करत आपल्या वर्तनाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला,” असं ते म्हणाले.
तसंच “मी हे व्हिडिओ शेअर करणार नव्हतो, कारण विधिमंडळाची प्रतिमा मलीन होऊ नये ही भावना होती. मात्र मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा करताच मला सत्य जनतेपुढे आणावं लागलं. आता चौकशी झालीच पाहिजे आणि ती निष्पक्ष व्हावी यासाठी कोकाटे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.
राजकीय वातावरणात सध्या या मुद्द्यावरून संतप्त चर्चा रंगली आहे. सत्ताधारी पक्षाकडून अद्याप या व्हिडिओंवर स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. कोकाटेंनी चौकशीपर्यंत राजीनामा देण्यास नकार दिल्याने विरोधक त्यांच्यावर अधिक चढाई करत आहेत.