WhatsApp

विरोधक रागावले! लोकसभा-राज्यसभा ठप्प, केंद्र सरकार अडचणीत

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद भवनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.



राज्यसभेचे अध्यक्षस्थान भूषवणारे भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले होते. मात्र, गोंधळ कायम राहिल्याने त्यांनी पुन्हा एकदा दुपारी २ वाजेपर्यंत सभागृह स्थगित करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही विरोधकांच्या आक्रमकतेमुळे काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज स्थगित केले.

विरोधक पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमधील SIR (Special Intensive Revision) मतदार याद्यांच्या कार्यक्रमाविरोधात चर्चा करण्याची मागणी करत होते. विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात फलक दाखवत सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावर अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फलक दाखवण्यावर आक्षेप घेतला. प्रश्नोत्तराचा तास सुरळीत पार पडावा, अशी मागणी अध्यक्षांसह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली, परंतु विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीने संसदेत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी नेते संसद भवनाच्या मकरद्वाराजवळ पायऱ्यांवर उभे राहून SIR प्रक्रियेविरोधात घोषणा देत होते. त्यांच्या मते, या प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधकांच्या आक्रमकतेमुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारकडून शांततेचे आवाहन केले जात असले तरी विरोधी पक्ष चर्चेला बंधन न ठेवता सरकारकडून उत्तरांची मागणी करत आहेत. यामुळे आगामी दिवसांत संसदेच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!