WhatsApp

अर्ज करणाऱ्यांसाठी दिलासा! कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २७ जुलैपर्यंत मुदतवाढ

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई |
राज्यातील कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी सहा दिवसांची मुदत मिळाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) आता २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून, पहिली प्रवेश यादी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.



शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीएस्सी अॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, फूड टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, अॅग्रीकल्चर इंजिनियरिंग, कम्युनिटी सायन्स, अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट अशा नऊ शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ४ जुलैपासून सुरू झाली होती. मात्र महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून सुधारित वेळापत्रक २१ जुलैला जाहीर झाल्यानंतर सीईटी कक्षाने अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत राज्यभरातून २५ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २१ हजार २५८ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केला आहे. आता २७ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार असून, कागदपत्रेही अपलोड करण्याची मुभा आहे. ही माहिती कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

सुधारित प्रवेश वेळापत्रक:

  • अर्ज व कागदपत्रे अपलोड: २७ जुलै
  • अंतरिम गुणवत्ता यादी: ३१ जुलै
  • हरकत व तक्रार नोंदणी: १ ते ३ ऑगस्ट
  • तक्रारींची यादी: ४ ऑगस्ट
  • अंतिम गुणवत्ता यादी: ५ ऑगस्ट
  • उपलब्ध जागांची माहिती: ५ ऑगस्ट
  • प्राधान्यक्रम नोंदणी (१ फेरी): ६ व ७ ऑगस्ट
  • पहिली प्रवेश यादी: ९ ऑगस्ट
  • रिपोर्टिंग कालावधी: १० ते १२ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीसाठी जागा: १३ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीचा प्राधान्यक्रम: १३ व १४ ऑगस्ट
  • दुसऱ्या फेरीची यादी: १६ ऑगस्ट
  • रिपोर्टिंग कालावधी: १७ ते १९ ऑगस्ट
  • तिसऱ्या फेरीची यादी: २३ ऑगस्ट
  • रिपोर्टिंग कालावधी: २४ ते २६ ऑगस्ट
  • कागदपत्रे व शुल्क भरायची अंतिम तारीख: २४ ते २६ ऑगस्ट
  • रिक्त जागांचा तपशील: २७ ऑगस्ट
  • महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी: ४ ते ८ सप्टेंबर
  • वर्ग सुरू होणार: २९ ऑगस्ट
  • प्रवेश प्रक्रिया समाप्ती: ८ सप्टेंबर

विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे पालन करत वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!