अकोला न्यूज नेटवर्क
सातारा | सातारा शहरात सोमवारी सायंकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने शाळेतून घरी येणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करत संबंधित मुलीचा जीव वाचवला आणि हल्लेखोर तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर तरुण अल्पवयीन मुलीस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्रास देत होता. सोमवारी सायंकाळीही त्याने मुलीचा पाठलाग करत तिला अडवले. यावेळी तिने प्रतिकार केला असता, संतप्त झालेल्या तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांनी या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्यावरही शस्त्र दाखवत धमकावले. मात्र काही तरुणांनी धाडस दाखवत त्याचे लक्ष विचलित केले आणि त्याला पकडले. मुलीची सुटका करून घेतल्यानंतर संतप्त जमावाने त्या तरुणाला चांगलाच चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे स्पष्ट केले असून अधिक तपास सुरू आहे. अशा प्रकारांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.