अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे. आपल्या पत्रात त्यांनी आरोग्यासंबंधी काही गंभीर कारणांचा उल्लेख करत उपचार घेण्यासाठी काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याची गरज असल्याचं नमूद केलं आहे.
धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार ११ ऑगस्ट २०२२ रोजी स्वीकारला होता. त्या आधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. उपराष्ट्रपतीपदी असताना त्यांनी राज्यसभेचे सभापती म्हणूनही आपली भूमिका बजावली आणि सभागृहातील कार्यवाही नियंत्रित करताना आपली स्पष्ट, सुसंगत भूमिका दाखवली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती डळमळीत असल्याची नोंद आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार दीर्घकालीन उपचार घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. यामुळे त्यांनी वैयक्तिक आरोग्याला प्राधान्य देत, या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची हालचाल वाढली असून, लवकरच नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर धनखड यांचा हा राजीनामा राजकीय व प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या घटनेमुळे केंद्र सरकारपुढे आता नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीचं आव्हान उभं राहिलं आहे. सत्ताधारी पक्ष कोणाला या पदासाठी पुढे करते आणि विरोधकांची भूमिका काय असते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.