अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | नाशिकमध्ये गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांना याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यासह इतर तरुणींशी अश्लील वर्तन केल्याचा, त्यांचे नग्न फोटो काढल्याचा व धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रफुल्ल लोढा हे जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे रहिवासी असून, भाजपमधील सक्रीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत यासंदर्भात गंभीर आरोप करत पेन ड्राइव्हमधील कथित पुरावे सादर केले होते. त्यांनी म्हटले होते की, नाशिक व परिसरात ७२ हून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेते या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. याचे मूळ जळगावच्या जामनेरमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर लोढा यांच्या जळगाव, जामनेर व पहूर येथील मालमत्तेची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. याआधीही साकीनाका पोलीस ठाण्यात लोढा यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता, यामुळे त्यांचे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर होते.
पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, ६२ वर्षीय लोढा यांनी १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणींना नोकरीचं आमिष दाखवलं. त्या तरुणींना त्यांनी ‘लोढा हाऊस’मध्ये बोलावलं आणि तेथे त्यांच्या consent शिवाय अश्लील कृत्ये केली. त्यांचे नग्न फोटो काढून त्यांचा वापर करून धमकावल्याचाही आरोप आहे. पीडित तरुणींनी दिलेल्या जबाबांवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
हे प्रकरण भाजपसाठी आणि राज्यातील सत्ताधारी यंत्रणांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. विरोधकांनी यावरून जोरदार हल्ला चढवला असून, भाजपने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सुरू आहे.