अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. भाजपने त्यांना सांभाळण्याच्या सूचना थेट दिल्लीहून दिल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेत अस्वस्थता असून, शिंदेंच्या हालचालींमुळे भाजप सावध झाला आहे.
अधिवेशनाच्या दरम्यान अचानक दिल्लीत गेलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचे समजते. यानंतर भाजपला शिंदे यांच्याकडून ‘सिग्नल’ मिळाल्याची चर्चा आहे. मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युती करण्याच्या शक्यतेमुळे मराठी मतांचं विभाजन होऊन भाजपचं नुकसान होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपने शिंदे यांना नाराज न करता मुंबई महापालिकेतील युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील काही महिन्यांत उद्धव गटातील अनेक नगरसेवक आपल्या गटात आणले आहेत. त्यामुळे त्यांनी महापालिकेत जास्त जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे भाजप १२० ते १४० जागा लढवण्याचा विचार करतोय. युती टिकवून ठेवली तरी भाजप सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिंदेंनी स्वतंत्र मतपेढी उभारण्यासाठी नवाप्लॅन अंमलात आणला आहे.
गेल्या आठवड्यात शिंदेसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती जाहीर केली. दलित मतदारांवर लक्ष केंद्रित करत ही युती करण्यात आली असून, ही युती रामदास आठवले यांच्या रिपाइंवरही दबाव टाकणारी ठरू शकते. शिंदेंनी वेगळ्या दिशा शोधण्यास सुरुवात केल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
भाजपची २०२९ साठी स्वबळाची तयारी सुरु असल्याच्या चर्चेमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवूनही शिंदेंना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागल्याने नाराजी आहे. भाजपवर ‘गरज संपल्यावर मित्रपक्षांना बाजूला सारते’ असा आरोप होण्याची भीतीही भाजप नेतृत्वाला वाटू लागली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक नसून, मराठी राजकारणात कोण ‘किती पाणी’ पितो, हे दाखवणारा निर्णायक टप्पा ठरू शकतो. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युतीचे समीकरण आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींकडे राज्याच्या राजकारणातील सर्वांचे लक्ष लागले आहे.