WhatsApp

पावसाळा संपताच कामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचा जलसंधारण विभागाला इशारा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला |“जलयुक्त शिवार योजनेत मंजूर कामांची मान्यता व निविदा प्रक्रिया पावसाळा संपण्याआधीच पूर्ण करा, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नव्या इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी जलसंधारण कामांचा आढावा घेतला.



या बैठकीला जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, भूजल सर्वेक्षण विभागाचे संजय कराड, जल जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, तसेच कृषी, पंचायत समिती आणि इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी “जलयुक्त शिवार”, जलसाठ्यांची प्रगणना, भूजल नियोजन आदी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

जिल्हाधिकारी कुंभार यांनी स्पष्टपणे सांगितले की, जलसंधारणाशी संबंधित कोणतेही काम प्रशासनातील प्रक्रिया किंवा वेळेअभावी रखडता कामा नये. विशेषतः निविदा व प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पावसाळ्यानंतर लागोपाठ होऊ नये, तर पावसाळा संपण्याच्या आधीच ही कामे मार्गी लागली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी तालुकास्तरीय बैठकाही तातडीने घेण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी जिओ पोर्टलवर जलसंधारण व कृषी विभागाकडून अद्यापही नोंद न झालेल्या कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात एकूण १५९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी ११९ कामे पूर्ण झाली आहेत. ११ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. मात्र, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या स्वयंसेवी संस्थेने काही कामे पूर्ण केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे, ‘नाम फाऊंडेशन’च्या कामाबाबतही त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.

जलसंधारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, कोणतीही यंत्रणा वेळकाढूपणा करणार असल्यास त्यांच्यावर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. यंदाच्या हंगामात अधिकाधिक जलसाठे तयार व्हावेत, यासाठी कामांना वेग देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment

error: Content is protected !!