अकोला न्यूज नेटवर्क
नेरळ (ठाणे): ठाणे जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलू गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 32 वर्षीय महिलेच्या प्रियकराने तिच्या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी जितेंद्र सुखदेव चोपडे याच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.मौजे शेलू येथील एका सोसायटीत राहणारी पीडितेची आई गेल्या तीन वर्षांपासून जितेंद्र चोपडेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या काळात तिच्या दोन मुलींपैकी 8 वर्षीय मुलीवर जितेंद्रने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. पीडितेच्या आईला ही बाब लक्षात येताच तिने तातडीने आपल्या मुलीला घेऊन नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी पीडित मुलीची विचारपूस केली. मुलीने सांगितले की, जितेंद्र रात्री ती झोपेत असताना तिच्यावर चुकीचे कृत्य करायचा. त्याने तिच्या खासगी अवयवांना हात लावून अत्याचार केले. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत जितेंद्रला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने दारूच्या नशेत दोन वेळा हे कृत्य केल्याची कबुली दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
