अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. वीज देयक सलग दोन महिने थकवणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीत आता तिसऱ्या महिन्यात सुरक्षा ठेवीतून थकबाकी वसूल केली जाणार आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी १५ जुलैपासून सुरू झाली असून, या निर्णयामुळे लाखो ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, कंपनीकडे सर्व संवर्गातील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी जमा झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सलग दोन महिन्यांचे वीज देयक न भरलेल्या ग्राहकांच्या खात्यात जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम थेट वसूल केली जाईल. ही रक्कम वळती केल्यानंतर ग्राहकाने ती पुन्हा जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील वीजजोडणी प्रक्रिया स्थगित केली जाईल.
याप्रकारामुळे ज्या ग्राहकांनी वाढीव वीज वापरानुसार मागवलेली सुरक्षा ठेव अद्याप भरलेली नाही, त्यांना ती संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच इतर शिल्लक देयके स्वीकारली जातील. जर ग्राहकाने ही रक्कम भरली नाही, तर त्याचा वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जाणार आहे. पुढे वीजजोडणीसाठी त्यांना जुनी सुरक्षा ठेव, थकबाकी आणि जोडणी शुल्क भरावे लागेल.
या नव्या पद्धतीच्या अंमलबजावणीपूर्वी ग्राहकांना सलग दोन महिने बिल न भरल्यास नोटीस दिली जात असे. त्या नोटीसमध्ये देयक भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाई. मात्र, आता तिसऱ्या महिन्यातच नोटीसशिवाय सुरक्षा ठेवीतून थेट वसुली केली जाणार आहे. ही पद्धत राज्यातील सर्व भागात लागू होणार असून मुंबई महानगर क्षेत्र या निर्णयातून सध्या वगळले आहे.
महावितरणच्या या निर्णयामुळे वीज ग्राहकांनी वेळेवर बिल भरण्यावर भर देणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणकडून केलेली ही पावले कठोर असली तरी अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे.