अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : भविष्य पाहण्याच्या बहाण्याने एकटी तरुणीला बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी एका कथित ज्योतिषाला अटक केली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरू (वय ४५) असे अटक केलेल्या ज्योतिषाचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीही महिलांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लॉ कॉलेजमध्ये शिकणारी २५ वर्षीय तरुणी आपल्या मोठ्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै २०२५ रोजी या ज्योतिषाकडे गेली होती. त्या वेळी त्याने भावासाठी एक विशिष्ट वनस्पती असल्याचे सांगून शनिवारी पुन्हा यायला सांगितले. काही वेळाने त्याने व्हॉट्सॲपवर तरुणीला “वस्तू आली आहे, एकटीच ये” असा संदेश पाठवला.
१९ जुलै रोजी सकाळी १० वाजता तरुणी कार्यालयात पोहोचली असता तिथे कोणीही नव्हते. ज्योतिषाने तिला “डोक्यावर मंत्र म्हणायचे आहेत, म्हणून पडद्यामागे ये” असे सांगितले. तरुणीने नकार दिला तरी तो तिच्यावर मिठी मारण्याचा आणि किस करण्याचा प्रयत्न करू लागला. धक्का देऊन तिने कशीबशी आपली सुटका केली आणि पळ काढला.
घडलेल्या प्रकाराची माहिती तिने तातडीने भावाला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
या ज्योतिषाने यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा सामना केला असल्याची शक्यता असून, पोलिसांकडून या बाबतीत तपास सुरू आहे. महिलांनी अशा घटनांना घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.