अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील गैरफायदा रोखण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा लाभार्थींना “एफएससी मल्टिपल इन फॅमिली” असा शेरा मारण्यात आला असून त्यांचा लाभ ऑगस्टपासून थांबवण्यात येणार आहे. राज्यात तब्बल दहा लाखांहून अधिक महिलांनी लाभ बंद झाल्याची तक्रार केली आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांची संख्याच दोन कोटी ५७ लाखांवर पोहोचली आहे. अर्ज करताना वय १८ ते ६५ वर्षांच्या महिला, कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी, एकाच कुटुंबातील केवळ दोन महिलांना पात्रता, चारचाकी वाहन नसणे आणि दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ न घेतलेला असणे, या अटी आहेत.
मात्र, अनेक अर्जांमध्ये अटींचा भंग झाल्याचे उघड झाले आहे. काही महिलांनी वयाची अट पूर्ण नसतानाही अर्ज केले. काहींनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून पात्र असल्याचे भासवले. तर काहींनी एकाच कुटुंबातील असून वेगवेगळी रेशनकार्डे असल्याचे दाखवले. आता अशा सर्व अर्जांची काटेकोर पडताळणी करण्यात येत असून प्राप्तिकर विभागाच्या माहितीच्या आधारे लाभ रद्द करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांनी आता संजय गांधी निराधार योजना किंवा इतर पर्यायी योजनांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.
लाभ बंद होण्याची कारणे:
- वयाची ६५ वर्षे पूर्ण
- स्वतःकडे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन
- अन्य शासकीय वैयक्तिक योजनांचे लाभार्थी
- १८ वर्षे पूर्ण नसतानाही अर्ज
तक्रार करण्याची सुविधा:
योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांसाठी ‘ग्रिवन्स’ हा पर्याय ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. महिलांना यासाठी स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून तक्रार नोंदवावी लागेल. त्याचप्रमाणे तालुकास्तरावरच्या बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्येही तक्रारी करता येतात. आतापर्यंत अशा तक्रारींची संख्या दहा लाखांवर गेली आहे.