WhatsApp

संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा गोंधळ, पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली |
संसदेस पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून जोरदार गोंधळ घातला. यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधकांनी हल्ल्याचे दोषी अद्याप मोकाट का आहेत, याचा जाब विचारत सरकारला धारेवर धरले. याचवेळी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध आम्ही थांबवलं असल्याचा दावा केल्याने संसदेत आणखी खळबळ उडाली.



राज्यसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, “जम्मू-काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली असून याचे गंभीर पडसाद पहलगाम हल्ल्यामुळे उमटले आहेत. या हल्ल्यातील दहशतवादी अद्याप जिवंत आहेत, त्यांना पकडले गेलेले नाही. ट्रम्प सतत सांगत आहेत की त्यांनी युद्ध थांबवलं. मग या सगळ्याचं उत्तर सरकारने संसदेत द्यायला हवं.”

लोकसभेतही विरोधकांनी याच मुद्यावरून घोषणाबाजी केली. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर त्वरित चर्चा करण्याची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा होईल असे सांगूनही गोंधळ सुरूच राहिला.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले की, “सरकार चर्चेसाठी तयार आहे. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीसमोर आपली मागणी मांडावी. मात्र सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही.”

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ३२ दिवसांमध्ये १८ कामकाज सत्रे होणार असून १५ हून अधिक विधेयके मांडली जाणार आहेत. यामध्ये ८ नवीन विधेयके असून उर्वरित विधेयके प्रलंबित आहेत. मात्र अशा गोंधळामुळे संसदेचे कार्यकाळ मुळ मुद्यांवर खर्च होण्याऐवजी गोंधळात वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!