WhatsApp

संपत्तीपायी बहिणीला मनोरुग्णालयात, आईला वृद्धाश्रमात पाठविले | नात्याला काळिमा फासणारी घटना

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
वडिलोपार्जित मालमत्तेच्या लालसेत एक भावाने आपली मोठी बहीण आणि वयोवृद्ध आई यांच्याशी नात्याला काळिमा फासणारी वर्तन केली. बहिणीला मनोरुग्ण ठरवून जबरदस्तीने रुग्णालयात भरती केलं, तर आईला वृद्धाश्रमात टाकल्याचा प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांनी या प्रकारात धर्मेंद्र इंदूर राय (वय ५४, रा. चेंबूर, मुंबई) या भावाला अटक केली आहे.



या घटनेत ५६ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला व त्यांची आई या सिंध हौसिंग सोसायटी, पुणे येथे राहत होत्या. मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी आरोपी धर्मेंद्र राय ७ जुलै २०२५ रोजी चार महिला बाउन्सर घेऊन घरी आला. त्याने बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन दिले आणि ब्लड टेस्टच्या नावाखाली जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिची मानसिक स्थिती पूर्णतः स्थिर असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

इतकेच नव्हे तर त्याने आईलाही तिच्या संमतीशिवाय एका वृद्धाश्रमात दाखल करून टाकले. घराचा मूळ ताबा बहिणीकडे असतानाही आरोपीने फसवणूक करत घरही हडप केला. या घटनेची माहिती मिळताच शेजारी, मित्रमैत्रिणींनी तत्काळ कारवाई करत महिलेला मनोरुग्णालयातून सोडवून तिच्या घरी आणले. परंतु धर्मेंद्र रायने तिच्या घरात प्रवेशास अडथळा निर्माण केला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज हांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र राय याच्याविरुद्ध विविध कलमांखाली, तसेच ‘मेंटल हेल्थ केअर अधिनियम’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान या प्रकारात सामील असलेल्या चार महिला बाउन्सर्सवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मानवतेच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेची चौकशी अधिक सखोल करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!