अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई| राज्यातील शेतकरी संकटात असतानाही राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे एका व्हिडिओमध्ये रमी खेळताना दिसल्याने प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे कारवाईची मागणी करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, “दर तीन तासांनी एक शेतकरी आत्महत्या करतो, आणि आपल्या कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात व्यस्त आहेत. ही नैतिकतेची घोर पातळी आहे.” त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही थेट पंतप्रधानांकडे जाणार.”
सुळे यांनी कोकाटे यांचे पूर्वीचे वादग्रस्त विधानही उजळणी करत त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘ओसाड गावची पाटीलकी’, ‘भिकारी एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीक विमा देतो’, ‘कर्जमाफी झाली की साखरपुडे करता’, अशी वक्तव्ये करून त्यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवली असल्याचा आरोप सुळेंनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा अशा गंभीर मुद्द्यांवर सरकार निष्क्रिय आहे, असा आरोपही त्यांनी केला. याच अधिवेशनात पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी, ‘ऑपरेशन सिंदूर’ची पारदर्शक माहिती, तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकृत्वावर भारत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोकाटे यांच्या व्हिडिओमुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याचे हत्यार मिळाले असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या राजकीय संघर्षास कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.