अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | अकोट शहरातील श्रीराम सुपर शॉपीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कार्फ बांधून आलेल्या अनोळखी महिलेने ५०० रुपयांची बनावट नोट देत दुकानदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेनंतर अकोटमध्ये बनावट नोटांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना घडली तेव्हा दुकानात वर्दळ होती. संबंधित महिलेला कुणी ओळखले नाही. गडबडीत तिने ५०० रुपयांची नोट देत खरेदी केली आणि लगेच निघून गेली. काही वेळानंतर दुकानदाराने पैसे तपासले असता एक नोट संशयास्पद वाटली. अधिक बारकाईने पाहिल्यानंतर ती नोट बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने लगेचच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. सदर बनावट नोट हुबेहुब खऱ्या नोटेसारखी होती. त्यामुळे सामान्य माणसाला ती बनावट आहे, हे लगेच समजणे शक्य नव्हते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, स्थानिक बाजारपेठेत याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरदेखील ही बातमी व्हायरल झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीही राज्यात विविध भागांत बनावट नोटा सापडल्याचे प्रकार समोर आले होते. विशेषतः ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांची हुबेहुब नक्कल करण्यात आली असून, ती चलनात सहज स्वीकारली जात असल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर अकोट पोलिसांनी व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुकानदारांनी मोठ्या रक्कमांचे व्यवहार करताना नोटांची तपासणी करावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्रिय ठेवावी आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

या घटनेने बनावट नोटा पुरवणाऱ्या टोळीबाबतही प्रश्न निर्माण केला आहे. अशा टोळ्या जिल्ह्यात सक्रीय असल्यास, नागरिकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून बनावट नोटा तयार करणाऱ्या किंवा पुरवणाऱ्या गटांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.