अकोला न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन | येत्या २ ऑगस्ट २०२७ रोजी पृथ्वीवर गेल्या शंभर वर्षांतील सर्वात मोठे आणि प्रदीर्घ पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे. या दुर्मीळ खगोलीय घटनेमुळे संपूर्ण जग काही क्षणांसाठी अंधारात बुडणार आहे. चक्क दिवसा सहा मिनिटांपेक्षा अधिक काळ सूर्याचा प्रकाश पूर्णपणे लोपणार असून, त्यामुळे विविध देशांमध्ये आकाशात रात्र अनुभवण्याचा अद्वितीय अनुभव लोकांना मिळणार आहे.
खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, हे सूर्यग्रहण तब्बल ६ मिनिटे २३ सेकंद इतक्या प्रदीर्घ काळासाठी चालेल. हे एक पूर्ण सूर्यग्रहण असेल आणि त्यामुळे सूर्य पूर्णपणे चंद्रामागे लपेल. त्यामुळे आकाशात काही मिनिटांसाठी गडद अंधार पसरलेला दिसेल. ही घटना मानवी डोळ्यांसाठी एक अद्वितीय पर्वणी ठरणार आहे. या ग्रहणाचा आरंभ अटलांटिक महासागरात होईल. त्यानंतर ते जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करत दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये दिसेल.
स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया आणि इजिप्त यांसारख्या देशांमध्ये हे सूर्यग्रहण स्पष्टपणे पाहायला मिळेल. विशेषतः इजिप्तमध्ये हे ग्रहण आकाशाच्या सर्वोच्च बिंदूवर दिसणार असल्याने तेथून मिळणारा दृष्याविष्कार सर्वात लक्षवेधी असणार आहे. त्यानंतर हे ग्रहण सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालियामार्गे पुढे जाईल आणि शेवटी हिंद महासागरात समाप्त होईल.
सौर ग्रहण ही एक अत्यंत दुर्मीळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना असते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अचूक रेषेत होणारी मांडणी ही या घटनेला कारणीभूत ठरते. ही स्थिती निर्माण झाली की चंद्र पृथ्वीवर सूर्यप्रकाशाचा मार्ग अडवतो. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात काही मिनिटांसाठी रात्रीसारखा अंधार पडतो.
गेल्या काही दशकांमध्ये अनेक सूर्यग्रहण घडली असली, तरी या २०२७ मधील ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. २०२७ च्या ग्रहणापूर्वीचे सर्वात मोठे सूर्यग्रहण इ.स.पू. ७४३ मध्ये झाले होते. ते ७ मिनिटे २८ सेकंद चालले होते. त्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ चालणारे सूर्यग्रहण हीच घटना ठरणार आहे. त्यामुळे जगभरातील खगोलप्रेमी आणि वैज्ञानिकांनी या घटनेची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
भारतामधील नागरिकांना मात्र ही खगोलीय घटना प्रत्यक्ष पाहता येणार नाही. कारण हे ग्रहण भारतात दृश्यमान नसेल. त्यामुळे भारतातील शास्त्रज्ञ, खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना परदेशात जाऊनच हे दृश्य अनुभवावे लागणार आहे. संपूर्ण जगाच्या दृष्टीने २ ऑगस्ट २०२७ ही तारीख एका ऐतिहासिक दिवशी नोंदवली जाणार आहे.