अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार असताना भारतीय संघाला आणखी एका खेळाडूच्या दुखापतीचा फटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांतून बाहेर गेला आहे. याआधी आकाशदीप आणि अर्शदीप सिंग यांनाही दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं होतं.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नितीश कुमार रेड्डीला रविवारी जीममध्ये सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचं मानलं जात असून बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी संघ व्यवस्थापनाने त्याला उर्वरित मालिकेसाठी अनुपलब्ध मानलं आहे.
रेड्डीची अनुपस्थिती भारताच्या गोलंदाजी आघाडीला मोठा फटका मानली जात आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आला आहे. ‘एके ४७’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या २४ वर्षीय गोलंदाजाला मँचेस्टर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतसुद्धा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने चौथ्या कसोटीत केवळ फलंदाज म्हणूनच मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी पुन्हा एकदा ध्रुव जुरेलकडे सोपवली जाऊ शकते.
तीन कसोटी सामने खेळल्यानंतर इंग्लंड २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत अवघ्या काही धावांनी झालेल्या पराभवामुळे भारतासाठी चौथा सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र, सातत्याने होत असलेल्या दुखापतींमुळे भारतीय संघ संकटात सापडला आहे.
नितीश रेड्डीच्या जागी कंबोज संघात दाखल झाल्यामुळे भारतीय आघाडी फळीवर दबाव येण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत कंबोजकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा संघाकडून ठेवली जात आहे.