अकोला न्यूज नेटवर्क
दिल्ली | द्वारका येथील एका ३६ वर्षीय ज्वेलर्सच्या रहस्यमय मृत्यूचा उलगडा करताना पोलिसांनी दिलेला खुलासा धक्कादायक ठरला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात ३६ वर्षीय करण देव याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या पत्नी सुष्मिता हिने रुग्णालयात आणला होता आणि विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र मृत्यूचे खरे कारण पुढे येताना पोलिसांसमोर खूनाचा संपूर्ण कटच उघड झाला.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुष्मिता ही राहुल नावाच्या २४ वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंधात होती. राहुल हा सुष्मिताचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. दोघांनी मिळून करणची झोपेच्या गोळ्या व विजेच्या धक्याने हत्या करण्याचा कट आखला.
१३ जुलै रोजी त्यांनी करणच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतरही तो शुद्धीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुष्मिताने इन्स्टाग्राम चॅटद्वारे राहुलशी संवाद साधला. चॅटमध्ये ती म्हणते, “औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो, तपास. उलट्या झाल्या नाहीत आणि मृत्यूही झाला नाही.” यावर राहुलने सुचवले, “काही कळत नसेल तर शॉक दे.”
चॅटमध्येच पुढे राहुलने करणला विजेचा धक्का देण्यासाठी टेप वापरण्याचा सल्ला दिला. सुष्मिता म्हणते, “मी तोंड उघडू शकत नाही, औषध देता येत नाही, तू ये, आपण मिळून करू.” नंतर ती करणला रुग्णालयात घेऊन जाते, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणात निर्णायक वळण तेव्हा आले, जेव्हा करणचा भाऊ कुणाल याने पोलिसांशी संपर्क साधला. त्याने सुष्मिता व राहुल यांच्यातील चॅट पोलिसांना दिले आणि आपल्या भावाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. सुष्मिता व राहुल यांचे जबाब विसंगत ठरल्याने पोलिसांना दोघांवर संशय गेला. चौकशीत सर्व पुरावे सापडल्यावर शनिवारी पहाटे दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने सोशल मीडियावरून कट रचून खून केल्याचे गंभीर वास्तव समोर आले असून, सायबर पुरावे, गूगल सर्चेस आणि इंस्टाचॅटचा वापर करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.