WhatsApp

भारताची गणितात जागतिक चमक : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सहा पदकांची कमाई

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने सहा पदके पटकावत जगभरात आपली बौद्धिक ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवत सातवे स्थान मिळवले. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा भारताने जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवले आहे.



या स्पर्धेत एकूण ११० देशांतील ६३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारताच्या वतीने महाराष्ट्रातील आधित्य मंगुडी, दिल्लीतील कणव तलवार आणि आरव गुप्ता यांनी सुवर्णपदक मिळवले. तर कर्नाटकातील अबेल जॉर्ज मॅथ्यू व दिल्लीच्या अधीश जैन यांनी रौप्य पदक पटकावले. दिल्लीच्या आर्चित मानस याने कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेतील भारतीय संघाचे नेतृत्व भारतीय संख्याशास्त्र संस्थेच्या प्रा. शांता लैश्राम यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनासाठी डॉ. मैनाक घोष, अतुल शतावर्त नाडिग आणि डॉ. राजू सैनी यांचा समावेश होता. ही कामगिरी अधिक विशेष ठरते कारण भारताने तिसऱ्यांदा सातवे स्थान मिळवले असून, सलग दुसऱ्यांदा तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

१९९८ पासून भारत या स्पर्धेत सहभागी आहे. आतापर्यंत भारताने एकूण २३ सुवर्णपदके मिळवली असून, त्यातील १२ फक्त २०१९ ते २०२५ या कालावधीत मिळवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांत नऊ सुवर्णपदके मिळवून भारताने सातत्य दाखवले आहे.

या यशामागे टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे महत्त्वाचे योगदान आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षणाची जबाबदारी हे केंद्र पार पाडते. या विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा घेऊन केली जाते.

गणित ऑलिम्पियाडमध्ये बीजगणित, संख्या सिद्धांत, संयोजनशास्त्र आणि भूमिती या विभागांवर आधारित अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. तरीही भारताचे युवा गणितज्ञ सातत्याने जागतिक स्तरावर आपली चमक दाखवत आहेत, ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!