अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेगाड्यांमध्ये सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निर्दोष ठरवत सुटका केली. या निर्णयाने तब्बल १८ वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
साखळी बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ८२४ जण जखमी झाले होते. २०१५ साली विशेष मोक्का न्यायालयाने या प्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातील पाच आरोपींना मृत्युदंडाची, तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं.
या प्रकरणाची सखोल फेरचौकशी आणि पुराव्यांच्या नव्या मूल्यमापनानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला की, या आरोपींविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी अपुरे आहेत. त्यामुळे विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्व १२ आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आलं.
या निकालामुळे न्याय व्यवस्थेतील तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एवढ्या मोठ्या दहशतवादी घटनेतील वास्तविक दोषींविषयी संशय व्यक्त होत आहे. प्रकरणाचा संपूर्ण तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. यानंतर काही काळ सीबीआय आणि एनआयएकडे तपास गेला, मात्र न्यायालयात मुख्य पुरावे ठेवण्याचं काम एटीएसनेच केलं होतं. सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.