WhatsApp

‘आरजेडी’कडून जमिनी बळकावल्या, ‘नवा बिहार’ घडवणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मोतिहारी (बिहार) |
राजदने (आरजेडी) बिहारमध्ये गरिबांच्या जमिनी बळकावूनच त्यांना रोजगार देण्याची योजना आखली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मोतिहारी येथील सभेत केला. राजदकडून युवकांना रोजगार देण्याची कोणतीही कल्पना न मांडता केवळ आश्वासने देण्यात आली, असेही त्यांनी म्हटले.



या सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते. काँग्रेस आणि राजद यांनी केवळ गरीब व वंचितांच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप करत, मोदी यांनी बिहारच्या मागासलेपणाचे खापरही या दोन्ही पक्षांवर फोडले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोदींनी “बनायेंगे नया बिहार, फिर एक बार एनडीए सरकार” असा नवा नारा देत एनडीएच्या पुढील सत्तेचे संकेत दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “राजद-काँग्रेसच्या काळात बिहारला विकासापासून वंचित ठेवले गेले. त्यांनी गरिबांच्या नावावर सत्ता मिळवली, पण कल्याणाचा विचार कधीच केला नाही. मात्र, केंद्र सरकार देशभरात युवकांना रोजगारासाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करत आहे.”

मोदींनी सांगितले की, एनडीए सरकार बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. पूर्व भारताच्या प्रगतीसाठी ‘विकसित बिहार’ अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासाठी केंद्र सरकारने गेल्या ४५ दिवसांत राज्यातील २४ हजार बचत गटांना एक हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या सभेत मोदींनी चंपारण्यचा उल्लेख करत महात्मा गांधींच्या चळवळीला दिलेल्या प्रेरणेचे स्मरण केले. “मोतिहारीचा मुंबईसारखा विकास केला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

सभेदरम्यान मोदींचे लक्ष एका व्यक्तीकडे वेधले गेले, जो राम मंदिराची प्रतिकृती घेऊन उपस्थित होता. मोदींनी त्याची विशेष दखल घेत एसपीजीकडून ती प्रतिकृती मागवून घेतली आणि तिची योग्य नोंद घेतली जाईल, असे सांगितले. राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या दौऱ्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “बिहारमध्ये सुशासन ही आमच्या कार्यकाळाची ओळख आहे. याआधी सत्तेत असलेल्यांना योग्यरीत्या निधी वापरता आला नव्हता,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७,२०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यामध्ये रस्ते, रेल्वे, मत्स्योद्योग व इतर क्षेत्रांतील योजना समाविष्ट होत्या. बिहारमधून सुरू होणाऱ्या चार ‘अमृत भारत’ गाड्यांना देखील त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. दरभंगा येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) आणि पाटणा येथे इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन करताना मोदींनी आयटी, सेवा व स्टार्टअप्ससाठी नव्या संधी उभारण्याचा संदेश दिला. बिहारमध्ये नव्या विकासाची सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!