अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या संस्थेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी कुंभार यांनी, राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र व्यक्तींनी अवश्य घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रबोधिनीचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर, जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी, उपव्यवस्थापक ऋषिकेश विधाते, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
‘अमृत’ ही संस्था खुल्या प्रवर्गातील अशा जातींसाठी काम करते ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, महामंडळ अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून योजना मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’तर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येते, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी वरणगावकर यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, ‘अमृत’ संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रोत्साहनासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. त्यात रोजगारक्षम प्रशिक्षण, कृषी उत्पादनावर आधारित उद्योग प्रशिक्षण, शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा, ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण, तसेच रोजगार व नोकरी सहाय्य यांचा समावेश आहे. याशिवाय, सी-डॅक माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण, उद्योग इन्क्युबेशन सेंटर, किशोर विकास उपक्रम याही उपयुक्त योजना राबवण्यात येत आहेत.
जिल्हा कार्यालय स्थापन झाल्याने अकोला जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना थेट योजनांचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमामुळे युवक-युवतींना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळून त्यांच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.