WhatsApp

अकोला जिल्हा बाल शोषणमुक्तीसाठी एकत्र! कायदेशीर मार्गदर्शन आणि जनजागृतीचे आयोजन

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला |
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालय व महाविद्यालयात बालकांवरील अत्याचार, बालकामगार, बालविवाह आणि बालतस्करी यांविरोधात जनजागृतीसह कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास कार्यालय आणि ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.



बाल शोषणाच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत असलेल्या प्रशासनाने जनतेला सजग करण्याचा निर्धार करत, विद्यार्थ्यांसह पालकांनाही महत्त्वाचे मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती आर. एन. बंसल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांनी गुन्हा म्हणजे काय, कोणत्याही अमिषाला बळी न पडण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच विभक्त कुटुंबातील पालकांना मोफत सल्ला सेवा उपलब्ध असल्याची माहिती दिली.

उपमुख्य लोक अभियुक्त जिल्हा न्यायालयाचे प्रवीण होनाळे यांनी ‘पॉक्सो कायदा २०१२’, पीडित बालकांसाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. बालकांचे संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी कायदे किती प्रभावी आहेत, यावर भर दिला.

चाईल्ड लाईन १०९८ विषयी माहिती हर्षाली गजभिये यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या आधारे सजग राहण्याची शिकवण देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मानकर यांनी आई-वडिलांचे कष्ट समजून घेऊन शिक्षणात यशस्वी होण्याचे आवाहन केले. बालविवाह, बाल कामगार आणि बाल शोषणमुक्त अकोला जिल्ह्यासाठी सपना गजभिये यांनी शपथ दिली.

Watch Ad

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दराडे यांनी केले, तर प्रास्ताविक शंकर वाघमारे (जिल्हा प्रकल्प समन्वयक, आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला) यांनी केले. कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा वर्कर्ससह शेकडो विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवला. अकोला जिल्ह्यातील शालेय स्तरावर असे व्यापक जनजागृती उपक्रम घेतल्याने प्रशासन आणि शिक्षण संस्थांमधील समन्वय वाढून बालकांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!