WhatsApp

शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसायाचा हातभार, नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त अकोल्यात मार्गदर्शन

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला |
दुग्ध व्यवसायास शेतीच्या समकक्ष मान्यता मिळाल्यानंतर आता ग्रामीण भागात पूरक व्यवसायांना चालना मिळू लागली आहे. अशाच पार्श्वभूमीवर, अकोल्यात आज नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था व बँक प्रतिनिधींना विविध योजनांची माहिती देण्यात आली.



जि.प. प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या इमारतीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे अध्यक्षस्थानी होते. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीराम वाघमारे, जिल्हा अग्रणी बँकेचे नयन सिन्हा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे श्री. गटकळ, सहकारी बँकेचे श्री. पारधी, आरसेटीचे संचालक विद्याशंकर, डॉ. स्वप्नील कुकडे, श्री. तेलगोटे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. लोखंडे यांनी सहकारी संस्थांच्या संगणकीकरणामुळे कृषी सहकाराच्या बळकटीकरणाला चालना मिळत असल्याचे सांगितले. श्री. वाघमारे यांनी नाबार्डच्या १९८२ पासूनच्या वाटचालीत घेतलेल्या योजनांची माहिती देताना, फार्मर क्लब, स्वयंसहायता समूह बँक लिंकेज, किसान क्रेडिट कार्ड, आरआयडीएफ आणि पीओडीएफसारख्या योजनांचा विशेष उल्लेख केला. विशेष म्हणजे, सेवा सहकारी संस्थांना केवळ कर्जपुरवठ्यावर न ठेवता दुग्धसंकलन, प्रक्रिया, केंद्रे उभारणे अशा विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण उद्योगविकासात सहभागी करण्याची भूमिका नाबार्डने घेतली आहे. अकोल्यातील व्याळा गावातील यशस्वी प्रयोगाचे उदाहरण देत, ही वाटचाल इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरू शकते, असे वाघमारे यांनी नमूद केले.

डॉ. स्वप्नील कुकडे यांनी विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील संधींचे सविस्तर चित्र मांडताना, जनावरांची खरेदी, अर्थसहाय्य व प्रक्रिया केंद्रांबाबत माहिती दिली. बँक प्रतिनिधींनीही कर्जप्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व माविम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन पूरक व्यवसायाच्या दिशेने शेतकरी पाऊल टाकत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

Leave a Comment

error: Content is protected !!