WhatsApp

नोकरीचं आमिष… पण दुबई नव्हे, थेट पोलीस ठाणं गाठलं!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी मुंबई |
दुबईत उच्च पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सिराज इद्रीस चौधरी (वय ५५) या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने १७ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. अखेर आरोपीला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं.



विक्रोळीतील टागोरनगर येथे राहणाऱ्या सिराज चौधरीविरोधात यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुबईत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला तो विश्वासात घेऊन नोकरी संदर्भात अनेक गोष्टी सांगत राहिला. मात्र, काही दिवसांतच त्याने आपली खऱ्या हेतूची ओळख दाखवली. पीडित महिलेला वेळोवेळी भेटण्याच्या बहाण्याने तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत होता आणि त्या दरम्यान तिच्यावर अत्याचार करत होता.

सिराज चौधरीने या महिलेच्या आर्थिक गरजांचा गैरफायदा घेत तिच्यावर मानसिक दबाव आणला. नोकरी मिळवून देतो, पासपोर्ट तयार करतो, व्हिसा लावतो अशा अनेक कारणांनी त्याने पीडितेला अडकवले होते. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून त्याचा शोध घेतला आणि अखेर १५ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली.

आरोपीला वाशी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर १६ जुलै रोजी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला असून, त्याचा मागील गुन्हेगारी इतिहासही तपासला जात आहे. या घटनेमुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांनी अशा आमिषांपासून सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!