WhatsApp

अर्धी दाढी, पूर्ण टोले! उद्धव ठाकरेंचा शिंदेंना शाब्दिक चोप

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई |
“त्यांची अर्धी दाढी राहिलीय हेच नशीब! त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच शिंदेंनी ठाण्यातील एका कार्यक्रमात “मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तर ते आडवे झाले” असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ही खोचक प्रतिक्रिया दिली.



या मुलाखतीत ठाकरे यांनी केवळ शिंदेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठवली. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “ठाकरे ब्रँड आम्ही बनवलेला नाही. तो लोकांनी स्वीकारलेला आहे. प्रामाणिक संघर्ष करणारे, लोकांच्या भावनांना वाचा फोडणारे ठाकरे हेच खरे आहेत.”

ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘ठाकरे’ हे नाव कोणीही चोरू शकत नाही. चिन्ह चोरले, पक्ष फोडला, पण लोकांचा विश्वास चोरणे अशक्य आहे. ते म्हणाले, “शिवसेना हे नाव आमच्या आजोबांनी आणि वडिलांनी दिले आहे. निवडणूक आयोगाला ते दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. चिन्ह देण्यात येऊ शकते, पण नाव नाही.”

शिंदे यांच्या पक्षाच्या भवितव्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “ते अखेरीस त्यांच्या मालकांच्या पक्षात म्हणजेच भाजपमध्ये विलीन होतील. इतकी वर्षे झाली तरी ते जनतेला माझ्यापासून तोडू शकलेले नाहीत. लोकशाहीत काही चुकीचं केलं नसेल, तर कोणत्याही यंत्रणेला आमचं नाव किंवा चिन्ह काढण्याचा अधिकार नाही.”

दाढीवरील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी विचारले की, “महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत?” शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा देत त्यांनी म्हटले की, “लोकांनी जर त्यांची अर्धी दाढीही काढली, तर त्यात आमचं काही जाणार नाही. त्यामुळे त्यांनी बोलताना मर्यादा पाळाव्यात.”

उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!