WhatsApp

महिला हरिपाठातून थेट तीर्थयात्रा; वारकरी साहित्य परिषदेचे अनोखे आयोजन

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला |
राज्यभर संत साहित्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ‘वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र’ या संस्थेचा १४ वा वर्धापन दिन येत्या नोव्हेंबर महिन्यात साजरा होणार आहे. त्या निमित्ताने अकोला जिल्ह्यामध्ये भव्य महिला हरिपाठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.



संत साहित्य प्रसाराच्या ध्यासातून ११ नोव्हेंबर २०११ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या नेतृत्वाखाली आजवर १३ अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीरीत्या पार पडले आहेत. ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी’ उपक्रम राबवण्यात आला. तसेच ‘झाडू संतांचे मार्ग’ या उक्तीप्रमाणे तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले.

या संस्थेने ‘संत मुक्ताई-जनाई महिला हरिपाठ मंडळा’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरावर महिलांचे हरिपाठ मंडळ स्थापन केले आहेत. आता संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने अकोला जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील महिला हरिपाठ मंडळांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या हरिपाठ मंडळाला ऋषिकेश-हरिद्वार यात्रा, द्वितीय क्रमांकासाठी कन्याकुमारी, तृतीय क्रमांकासाठी जगन्नाथ पुरी, चौथ्या क्रमांकासाठी तिरुपती बालाजी, पाचव्या क्रमांकासाठी जयपूर आणि विशेष पुरस्कार विजेत्यांसाठी मथुरा येथील यात्रा आयोजित केली जाईल. प्रत्येक विजेत्या मंडळातून वीस महिलांना मोफत तीर्थयात्रेची संधी दिली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यात नियोजनाची बैठक दिनांक २३ जुलै २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, बस स्थानकाजवळ, अकोला येथे होणार आहे. या बैठकीत स्पर्धेच्या तारखा व ठिकाण निश्चित केले जाणार आहे. बैठकीसाठी सर्व तालुक्यांचे महिला व पुरुष अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

वारकरी साहित्य परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शिवशंकर पाटील महाराज यांनी ही माहिती दिली. महिला जिल्हाध्यक्षा ह. भ. प. भारतीताई काळे माऊली यांच्यासह महिला तालुकाध्यक्षही नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील महिला हरिपाठ मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!