अकोला न्यूज नेटवर्क
गुरुग्राम : मानेसर येथील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करताना गुरुग्राम पोलिसांनी थेट स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे. हे प्रकरण एखाद्या चित्रपटातील कथानकासारखं वाटावं, इतकं नाट्यमय घडलं. ग्राहक म्हणून पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी थेट सौद्यांची माहिती मिळवली आणि शेवटी कपल आक्षेपार्ह अवस्थेत सापडले.
गुरुग्रामच्या आयएमटी मानेसरमधील सेक्टर-2 येथील आम्रपाली इमारतीत ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्रॅव्हिटी’ या नावांचे दोन स्पा सेंटर चालवले जात होते. या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्राहकाच्या वेशात एक गुप्त अधिकारी या स्पामध्ये पाठवला. त्याने स्पाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताच थेट महिलांची विक्री करण्यासंबंधी बोलणी सुरू झाली. करार ठरताच अधिकाऱ्याने इशारा दिला आणि पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान एका कपलला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आलं. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ऑस्कर स्पाचा व्यवस्थापक महेंद्र कुमार, स्पाचा ग्राहक सुरजीत आणि गोल्डन ग्रॅव्हिटी स्पाची मालकीण आशिया खातून यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणात चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की, स्पा सेंटरच्या आडून त्यांच्याकडून नियमितपणे सेक्स रॅकेट चालवले जात होते. यामध्ये महिलांची तस्करी करून जबरदस्तीने त्यांना या धंद्यात ढकललं जात होतं. याआधीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये गुरुग्राम पोलिसांनी महिलांची सुटका करत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका हॉटेलमधून पोलिसांनी बांगलादेश व उझबेकिस्तानमधील महिलांसह १० जणांना अटक केली होती.
या सर्व प्रकारामुळे गुरुग्राममधील स्पा सेंटरबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सौंदर्य आणि आराम यासाठी प्रसिद्ध असलेली ही ठिकाणं, दुसरीकडे शरीरविक्रयाच्या दलदलीत बुडत चालली आहेत. सध्या पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू ठेवली असून, अशा अवैध व्यवसायावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे.