अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पुणे | राज्यात उष्णतेचा त्रास असतानाच हवामान विभागानं पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणात पावसानं तात्पुरती विश्रांती घेतली असली तरी पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांना यलो अलर्ट
हवामान विभागानं सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील घाटमाथ्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावतीसह विदर्भातील अनेक भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या मते, २४ ते ३१ जुलै आणि त्यानंतर ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
देशभरात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता
IMD आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार १८ ते २५ जुलैदरम्यान देशात बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा इशारा आहे. केरळ, दक्षिण कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आदी भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून, गुरुवारी बालताल आणि पहलगाम येथून सुरू होणारी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनानं सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमध्येही पुढील २४ तासांसाठी ५ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळमध्ये रेड अलर्ट, भूस्खलनाची भीती
कोझिकोड जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली असून, काही घरांमध्ये पूराचं पाणी शिरल्याची माहिती आहे. कोझिकोड, वायनाड, कन्नूर, कासरगोड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ आणि २० जुलैला मलप्पुरमसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राच्या उग्र रूपामुळे किनारी भागांत सतर्कतेचं आदेश देण्यात आलं आहे.