अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली| देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऊर्जा संवाद’ कार्यक्रमात याचे संकेत दिले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ६५ डॉलरच्या आसपास असून, त्या स्थिर राहिल्यास सरकार पुढील दोन-तीन महिन्यांत दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
इराण-इस्रायल तणाव टळल्यास दर कपात संभवते:
पुरी यांनी स्पष्ट केले की, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहणं हे दर कपातीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जागतिक पातळीवर इराण-इस्रायलसारखा कोणताही नव्या तणाव निर्माण झाला नाही, तर दर स्थिर राहतील आणि सरकारला इंधन दर कपात करण्याची संधी मिळेल.
सध्या सरकारी कंपन्यांचा नफा वाढत आहे:
सध्या तेल वितरण करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढत आहे. हेच दर कपातीसाठी सकारात्मक चिन्ह मानले जात आहे. मागील काही महिन्यांपासून दर वाढवले गेले नसल्यामुळे ग्राहकांमध्येही दर कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे.
आगामी दोन-तीन महिन्यांत निर्णय अपेक्षित:
पुरी यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन महिन्यांत केंद्र सरकार इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, हा निर्णय जागतिक तेलबाजारातील स्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे सध्या प्रत्यक्ष घोषणा करण्यात आलेली नाही.
जनतेसाठी संभाव्य दिलासा:
जर दर कपातीचा निर्णय झाला, तर त्याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना मिळेल. इंधन दर कपात झाल्यास वाहतूक खर्च, महागाई नियंत्रण, उद्योग व्यवसाय यांवरही सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे पुरींच्या वक्तव्यानंतर आता सर्वसामान्यांकडून दर कपातीसाठी प्रतीक्षा सुरू झाली आहे.