WhatsApp

डिजिटल अरेस्ट प्रकरणात देशात पहिली शिक्षा; आरोपीला ७ वर्षांची कैद

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नवी दिल्ली |
डिजिटल माध्यमांचा वापर करून लोकांना अडकवण्याच्या प्रकारात देशात प्रथमच एका आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखनौच्या सत्र न्यायालयाने देवाशिष राय या आरोपीस सात वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला आहे. या निकालामुळे अशा नव्या प्रकारातील सायबर गुन्ह्यांविरोधात कडक पाऊल टाकण्यात आले आहे.



डॉ. सौम्या गुप्ता यांच्याकडून ८५ लाखांची फसवणूक
मे २०२४ मध्ये आझमगडच्या मसौना गावातील आरोपी देवाशिष राय याने लखनौच्या डॉक्टर सौम्या गुप्ता यांना कस्टम अधिकाऱ्याच्या नावाने फोन केला. त्याने सांगितले की त्यांच्या नावावर एक संशयास्पद कार्गो सापडले असून त्यात बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड व ड्रग्ज आढळले आहेत. या आधारे त्यांना १० दिवसांसाठी ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगत, धमकी देत, तब्बल ८५ लाख रुपये वळते घेतले.

पाच दिवसांत अटक, तीन महिन्यांत आरोपपत्र
सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत गोमतीनगर एक्सटेंशन येथील मंदाकिनी अपार्टमेंटमधून आरोपीला अटक केली. निरीक्षक ब्रिजेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासात कोणतीही उशीर न करता तीन महिन्यांत आरोपपत्र सादर केले. या जलद कारवाईने संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले.

प्रत्येक तारखेला जामीन फेटाळला गेला
सदर खटल्यात पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर केला. आरोपीकडून जामीनासाठी केलेले प्रयत्न न्यायालयाने सातत्याने फेटाळले. तपासातील पुरावे, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहाराचे पुरावे आणि पीडितेचे जबाब यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली.

डिजिटल फसवणूक करणाऱ्यांना मोठा इशारा
या निर्णयामुळे देशातील सायबर गुन्हेगारीला चपराक बसली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या नव्या फसवणूक तंत्रांचा बिमोड करण्यासाठी याला उदाहरण मानले जात आहे. आता सायबर गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार, हा संदेश समाजात गेला आहे. नागरिकांनी अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला पोलिसांकडूनही पुन्हा देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!