अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, कांदिवलीतील ‘सावली बार’ या डान्सबारवर पोलिसांनी नुकतीच धाड टाकली. या बारचे परमिट खुद्द गृहराज्यमंत्रींच्या आईच्या नावावर असल्याचे परब यांनी स्पष्ट केलं. या छाप्यात २२ बारबाला, २२ ग्राहक व ४ कर्मचारी ताब्यात घेतल्याचे त्यांनी विधानसभेत मांडले.
डान्सबारवर बंदी असताना व्यवसाय?
डान्सबारवर बंदी असताना सावली बार सुरू कसा राहिला, असा सवाल उपस्थित करत परब यांनी यामध्ये थेट गृहखात्याची ढिलाई असल्याचा आरोप केला. पोलिसांनी पंचनामा करून ग्राहकांवर गुन्हे दाखल केले असून, बारमध्ये झालेल्या धाडीत मिळालेली माहिती खळबळजनक असल्याचे परब म्हणाले.
राजीनाम्याची मागणी
“एकीकडे बहिणींचे आशीर्वाद घेतले जातात, आणि दुसरीकडे मातोश्रींच्या नावावर बार चालवले जातात,” असा आरोप करत परब यांनी गृहराज्यमंत्री कदम यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली. त्यांनी अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले, “जर कारवाई झाली नाही, तर याला सरकारचा आशीर्वाद आहे असे समजले जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
विधानपरिषदेतील हल्लाबोल
विधान परिषदेतील चर्चेदरम्यान परब यांनी शासकीय यंत्रणांची कार्यपद्धतीही उघड केली. एका आरटीओ अधिकाऱ्याचा माजी कंत्राटी ड्रायव्हर अधिकाऱ्याचे कपडे घालून वाहनचालकांकडून दंड वसूल करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्याच्या फोटोसह पुरावे देण्याची तयारी दर्शवली व त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
जनसुरक्षा विधेयकावरही टीका
परब यांनी विधानमंडळाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. “राज्यपाल सुरक्षित नाहीत, आमदार मार खात आहेत, विधेयक चाटायचं का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. कालच्या गोंधळात झालेल्या मारहाणीवरून विधानसभेतील सुरक्षेची स्थिती त्यांनी अधोरेखित केली. हे सरकार कायदे आणि नैतिकतेचा किती आदर ठेवतं, यावर यापुढील कारवाई अवलंबून असेल, असा टोला त्यांनी लगावला.