अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अपघात कक्षात ऑन ड्युटी असलेल्या एका चीफ मेडिकल ऑफिसरने कार्यालयीन वेळेत अपघात कक्षामध्येच बेकायदेशीरपणे वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट आदेश दिले असून, कार्यालयीन वेळेत आणि शासकीय ठिकाणी अशा वैयक्तिक समारंभांचे आयोजन निषिद्ध आहे.
तथापि, संबंधित डॉक्टर, ब्रदर व सिस्टर यांनी या आदेशांना डावलून अपघात कक्षात वाढदिवस साजरा करताना गंभीर स्वरूपाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालयातील हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 च्या उल्लंघनास्पद ठरते.
सामाजिक कार्यकर्ते ऋषभ काळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शासकीय रुग्णालयासारख्या ठिकाणी, जेथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, तेथे वैयक्तिक कार्यक्रमांमुळे रुग्णसेवेत बाधा निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे प्रशासन आता याकडे कशी भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.