अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पुणे| केंद्र सरकारने पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पातील पुणतांबा ते शिर्डी या १६.५० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामासाठी २३९.८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुणे ते शिर्डी दरम्यान सध्याच्या सिंगल मार्गावर असलेला ताण कमी होणार असून, अधिक गाड्यांची वाहतूक शक्य होणार आहे.
‘हाय स्पीड’ऐवजी ‘सेमी हायस्पीड’चा निर्णय
पुणे ते नाशिक हाय स्पीड रेल्वेमार्गाला अडथळा ठरणारा खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प डावलण्यासाठी पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या नव्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. याच अहवालाचा भाग म्हणून पुणतांबा-शिर्डी मार्ग समाविष्ट करण्यात आला. आता ही मार्गिका ‘हाय स्पीड’ऐवजी ‘सेमी हायस्पीड’ स्वरूपात विकसित केली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वाहतुकीची क्षमता चारपट होणार
सध्या पुणतांबा-शिर्डी रेल्वेमार्गावरून काही मोजक्या गाड्यांची वाहतूक होते. या मार्गाची वाहतूक क्षमता १९.६६ टक्के असून, दुहेरीकरणानंतर ती ७९.७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ प्रवाशांसाठी नव्हे, तर मालवाहतुकीसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.
शिर्डीतील साई भक्तांना मोठा लाभ
या मार्गामुळे साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास अधिक गतीने आणि वेळ वाचवणारा होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे. याशिवाय स्थानिक व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी प्रवास अधिक सोपा होईल.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
या रेल्वे दुहेरीकरणामुळे कृषी उत्पादनांची वाहतूक जलद होईल, स्थानिक बाजारपेठांचा विकास होईल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. विशेष म्हणजे, साईबाबांच्या धार्मिक पर्यटनस्थळाला नाशिक आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाणार आहे.